Ad will apear here
Next
चाकरमान्यांनो, ‘येवा कोकण आपलाच आसा...’


चाकरमान्यांनो, ‘येवा कोकण आपलाच आसा...’

यायलाच हवं तुम्हाला...
गणपती काय आपल्या घरी कायमच असतो हो....
पण त्याचा उत्सव वर्षातून एकदाच होतो आणि तोसुद्धा किती मोठा!

नाही आलात तर त्याला काय वाटेल?
जीव काय, आज आहे उद्या नाही...
त्याची कशाला काळजी करायची!
आपण आहोत, तोपर्यंत मजेत जगायचं!
सारं काही त्या गणपतीला माहिती आहेच...
मग तोच घेईल जबाबदारी...
तुम्ही फक्त घ्या इकडे येण्याची खबरदारी...

करोनाने कोकणात आता चांगलेच हात-पाय पसरलेत...
पसरेना बापडा...
त्याला काय माहिती गणेशोत्सवाचं नि चाकरमान्यांचं नातं...
करोना काय, आज आहे उद्या जाईल...
पण उत्सवाला विसरून कसं चालेल?
काय म्हणताय? कोकणातल्या लोकांना भीती वाटतेय?
अहो, मग चुकतायत ते...
‘लिव्हिंग विथ करोना इज न्यू नॉर्मल!’ एवढं नको का कळायला त्यांना...!

करोना इथल्या लोकांचे, चांगल्या डॉक्टरांचेही प्राण घेतोय...
कारण म्हणे यंत्रणा पुरेशी नाही....
अहो, पण त्याचं काय एवढं विशेष?
मुंबईत एवढी हॉस्पिटल्स आहेत, तरी माणसं मरतायतंच ना? मग?

तुम्ही आलात तर निदान इथे हॉस्पिटल्स तरी वाढतील...
आणि आरोग्य यंत्रणा मजबुतीच्या गप्पा थोड्या तरी पुढे सरकतील...
आमच्या मागण्यांना विचारतो कोण?
कोकणात आहे तरी काय?
अडीचशे रुपयांचे माड आणि ५० रुपड्यांच्या पोफळीच ना!
तुम्ही येत राहिल्याशिवाय कोकणाला ‘विकास’ दिसणार तरी कसा?
म्हणून तुम्ही यायलाच हवं... उत्सव दणक्यात साजरा व्हायलाच हवा!

पोलीस, प्रशासन, आरोग्य यंत्रणा... सगळे सगळे राबतायत...
अपुऱ्या सामग्रीत धडपडतायत... सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी....
... पण त्यात काय विशेष? त्यांचं कामच आहे ते...
त्यांना करोना योद्धे म्हणतात ते काही उगाच नाही...
फक्त त्यांनीच मक्ता घेतलाय करोनाशी लढण्याचा...
म्हणून आपण बिनधास्त उत्सव साजरा करायचा...
त्यामुळे तुम्ही यायलाच हवं...
त्याशिवाय त्यांना भाग्य कसं लाभणार, योद्धा म्हणून काम करण्याचं...
नि त्यातच शहीद होण्याचं...

चाकरमानी, तुम्ही भलतेच मानी हे आम्हाला आता पक्कं कळलंय...
राज्यकर्त्यांनाही तुमच्या ‘मतांची’ किंमत कळते, तिथे आमचा काय पाड!
तुमच्या नि आमच्याही सुरक्षिततेसाठी तुम्ही येऊ नये,
असा फक्त विचार आम्ही मांडला काय...
थेट आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलंत तुम्ही...
काय तर म्हणे, ‘वर्गणीच्या वेळी हवेत चाकरमानी नि आता अडचणीच्या वेळी नकोत!’
तसं खरंच नव्हतं हो...
इथल्या अपुऱ्या आरोग्य यंत्रणेचं कौतुक काय दाखवणार होतो तुम्हाला!
पण तुमचा अपमान झाला ना...
आणि तुमचा अपमान तो राज्यकर्त्यांचाही अपमान...
दोन-तीन लाखांच्या संख्येनं तुम्ही आलात एक-दोन महिन्यांत... सरकारी परवानगीनं...
तेव्हा आणखी कळली आम्हाला तुमच्या ‘मतांची’ किंमत...
आणि भरून पावलो आम्ही, नेत्यांची माणसांना ‘बांधून’ घेण्याची कला पाहून...

सगळं बंद असताना तुम्ही येणार कसे, असा प्रश्न पडला होता आम्हाला खरं तर...
पण दोन-तीन लाख जणांना सरकारने कोकणात सोडलं, तेव्हा आम्ही काळजीच सोडली...
म्हटलं... आता गणेशोत्सव होणार... अगदी थाटात होणार...

आजपर्यंत गावांत चांगले रस्ते नाहीयेत,
पण करोना मात्र अलगद गावागावापर्यंत पोहोचला...
त्याचं काय एवढं कौतुक घेऊन बसलात... तो सगळीकडेच वाढतोय...

विघ्नहर्त्याच्या उत्सवाला जायचं म्हटल्यावर राजा आणखी उदार झाला...
क्वारंटाइन काळही १४ वरून १० दिवसांचा केला...
एकेक विघ्नं कशी आपोआप दूर होत जात आहेत...
कारण संकट गंभीर वाटलं होतं, तरी सरकार खंबीर आहे ना!
म्हणूनच चाकरमान्यांनो, ‘येवा कोकण आपलाच आसा...’

लॉकडाउन उठवलंय, ते रोजचं जगणं रुळावर यायला...
त्या त्या ठिकाणच्या लोकांची रोजीरोटी सुरळीत व्हायला...
मोडलेलं कंबरडं सरळ व्हायला..

त्याच नियमाचा आधार घेऊन तुम्ही बाहेरून इकडे आलात,
तरी आमची काही हरकत असण्याचा प्रश्नच नाही....
कारण ‘रीतसर’ परवानगी घेऊन येणार तुम्ही...
आम्ही कशाला आक्षेप घ्यायचा?
फार तर काय, करोनाबाधितांचा नि बळींचा आकडा वाढेल...
त्यात काय एवढं, तो सगळीकडे वाढतोच आहे...
सरकारी बैठकांना काही विषय नको का!
चाकरमान्यांनो, तुम्ही ते फारसं मनावर घेऊ नका...
‘येवा कोकण आपलाच आसा’

काही जणांना तरीही अजून वाटतंय, म्हणे...
बुद्धिदाता गणराया चांगली बुद्धी देईल सर्वांना...
पण आपण स्वतःच वेडे आहोत, हे त्यांना स्वतःलाच कळत नाहीये...
नि गणपतीकडून अपेक्षा करतायत!
(स्वतःच्या आगमनापेक्षा विसर्जनावेळी अत्यानंदाने नाचणाऱ्यांना पाहूनही
तो काही करू शकत नाही... मग याचं काय?)

गणपतीचा उत्सव दणक्यात केल्याशिवाय तो पावेल का?
आपण आहोत तिथे राहूनच पूजा करून कसं चालेल?
न जाणो, त्याचा कोप-बिप झाला तर...!

चाकरमान्यांनो, तुम्ही आलात नाही तर उत्सव होणार कसा?
बाजारपेठा फुलून जाणार कशा?
डीजेचा ठणठणाट होणार तरी कसा?
आणि बॉलिवूडच्या नृत्याने मिरवणुका रंग तरी उधळणार कशा?
अजून त्यासाठी परवानगी नाही याचं दुःख आहे म्हणता!
पण ती काय... मिळेलही थोड्या दिवसांत!

तुम्हीच सांगा... आजच्या काळात कोकणातल्या जुन्या उत्सवाला काही अर्थ आहे का?
न जाणो, तुम्ही यंदा आला नाहीत तर कदाचित पुन्हा पूर्वीसारख्या उत्सवाला सुरुवात व्हायची!
इथल्या नव्या पिढीला जुन्याची गोडी लागायची... नको नको नको...
काळाबरोबर सगळं आधुनिक असायलाच हवं... नाही का?

त्यामुळे, चाकरमान्यांनो,
करोना-बिरोना सगळं झूठ आहे, हा तुमचा समज बरोबरच आहे...
जिवाचं काय एवढं मोठं? तो काय, कधी तरी जायचाच आहे...
करोना झाल्यामुळे जाईल, नाही तर पैसे संपल्यामुळे जाईल...
कोणाचा तिथे जाईल, कोणाचा इथे जाईल...
कधी तरी मरायचंच आहे सगळ्यांना...
मरणाला काय घाबरायचं... जगरहाटी आहे ती...
काहीही असलं, तरी उत्सव व्हायलाच हवा...
‘तुम्ही येवा, कोकण आपलाच आसा...’

- अनिकेत कोनकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZXONCP
Similar Posts
‘No.. No... चेहऱ्याला हात लावू नका;’ करोना प्रतिबंधासाठी कम्प्युटर/लॅपटॉप देणार इशारा; तरुणाचे अॅप करोना विषाणूने सध्या जगभरात सगळीकडे हाहाकार माजवला आहे. त्यावर अद्याप औषध नसल्याने प्रतिबंधात्मक काळजीच कसोशीने घ्यायच्या सूचना अगदी जागतिक आरोग्य संघटनेपासून (WHO) सगळ्याच महत्त्वाच्या संस्था देत आहेत. करोनाचा संसर्ग टाळण्याचा एक उपाय म्हणून हात वारंवार धुवा आणि चेहऱ्याला सतत हात लावू नका, अशाही सूचना
गणेशोत्सव : वैभवशाली इतिहास, अस्वस्थ वर्तमान आणि आपण जगभरातला माणूस हा कायद्यापेक्षा संकल्पनांच्या अधीन राहून जगत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. बुद्धिप्रामाण्यवादाच्या नावाने श्रद्ध माणसाला कितीही अंधश्रद्ध ठरविण्याचा प्रयत्न झाला तरीही तो ऐकत नाही. कितीही त्रास झाला तरी कालानुरूप व्यवहार्य बदल स्वीकारून तो पुढे सरकत राहतो. यंदा कोरोना काळात कोकणात आपल्याला याचा अनुभव येतो आहे
असामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस! मनोहर पर्रीकर यांचं वागणं-बोलणं अगदी तुमच्या-आमच्यासारखं, म्हणजे सामान्य माणसासारखं असलं, तरी त्यांचं व्यक्तिमत्त्व असामान्य होतं. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘जीएस’च्या निवडणुकीला उभं राहता येत नाही. तरीही मनोहर पर्रीकरांच्या वेळी तो नियम बदलून त्यांना निवडणुकीला उभं करण्यात आलं आणि ते निवडूनही आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language